मुंबई | ‘मागील वेळी मी अपक्ष होतो. पण यंदा माझ्याबरोबर कमळ असेल, मोदी असतील, अमित शाह असतील, देवेंद्र फडणवीस असतील, त्यामुळे मला कसलीच चिंता नाही. स्थानिक आमदार मनोहर भोईर तर सोडाच, खुद्द उद्धव ठाकरे जरी इथून उभे राहिले तरी त्यांनाही हरवेन, असे आव्हानच उरणचे आमदार आणि भाजप नेते महेश बालदी (Mahesh Baladi) यांनी थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिले आहे.
महेश बालदी हे भाजप नेते असून, त्यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यानंतर त्यांनी पक्षाविरूद्ध बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तेव्हा ते निवडूनही आले. त्यानंतर आता बालदी यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ‘पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हा प्रकार थांबवण्यात यायला हवा. विरोधक जात, धर्म, पंथाची भाषा तेव्हाच करतात जेव्हा त्यांच्यातील कर्तृत्व संपते. माझ्यावरही आरोप झाले की मी मराठी नाही. बाहेरून आलेला आहे. पण मी त्याकडे लक्ष देत नाही’.
महाविकास आघाडीचा एक उमेदवार माझ्यासमोर उभा राहावा…
गेल्यावेळी मी अपक्ष होतो. पण यंदा माझ्याबरोबर कमळ असेल. स्थानिक आमदार मनोहर भोईर तर सोडाच, खुद्द उद्धव ठाकरे जरी इथून उभे राहिले तरी त्यांनाही हरवेन, असेही त्यांनी सांगितले. तसेच माझी एकच इच्छा आहे की, महाविकास आघाडीचा मिळून एक उमेदवार यावेळी माझ्यासमोर उभा राहायला हवा. या सगळ्यांना एकदाच हरवून टाकलं की हे लोक गप्प बसतील, असेही त्यांनी सांगितले.