यवतमाळ | महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. आणि अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यवतमाळमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शिवसेना किंवा कॉंग्रेसकडून जर प्रतिसाद मिळाला तर युतीचा विचार करू असा त्यांनी दावा केला आहे. जे कोणी पहिला प्रस्ताव देईल, ज्याच्यासोबत आम्हाला सोयीस्कर वाटेल त्याच्यासोबत आम्ही युतीचा विचार करू असे वक्तव्य आंबेडकर यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील राजकारणात अनेक नवीन घडामोडी, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील झाले. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद पाहायला मिळाले. आणि ह्या वातावरणात प्रकाश आंबेडकर यांचे हे वक्तव्य राजकीय वर्तुळात चांगलेच गाजतंय.
भाजपाला एकनाथ शिंदेही नको आहेत. त्यांना जसे उद्धव ठाकरे नको होते, तसेच एकनाथ शिंदेही नको आहेत. हे ओझंही त्यांना उतरवायचं आहे. त्यांना परिस्थिती त्यांच्या बाजूने दिसली तर ते निवडणुका घेणं पसंत करतील, असं देखील आंबेडकर यांनी म्हटलं.
आत्ता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या गटाची आणि भाजपाची युती होते का हे पाहावं लागेल, असंही प्रकाश आंबेडकरांनी नमूद केलं.
अंधेरी पोटनिवडणुकीत वंचितचा कोणाला पाठिंबा? यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आम्ही वेट अँड वॉच भूमिकेत आहोत. मला वाटतं ही निवडणूक शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी महत्त्वाची आहे.”
या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्याकडे कोणीही पाठिंबा मागितला नाही. त्यामुळे आम्ही कोणतीही भूमिका घेतलेली नाही,” असं आंबेडकरांनी सांगितलं आहे.