मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची ‘वर्षा’वर भेट घेतली. अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक (Andheri East by Election) होत असताना राज ठाकरेंच्या भेटीनंतर अनेक चर्चा सुरु आहेत. मात्र, त्यांची ही भेट आरोग्य विषयांवर चर्चा करण्यासाठी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय उलथापालथ होताना दिसत आहे. त्यातच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने अनेक चर्चा सुरु होत्या. राज ठाकरे हे शिंदे गटासह भाजपला पाठिंबा देणार असल्याचे या भेटीमागचे कारण सांगितले जात होते. मात्र, आरोग्य विषयावर चर्चा करण्यासाठी या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या बैठकीला आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील उपस्थित होते.
दीड तास बैठक
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे या उभय नेत्यांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली. पण या भेटीमागचे कारण समोर आल्याने ही बैठक अराजकीय असल्याचे म्हटले जात आहे.