कोल्हापूर | शिवसेनेत काही महिन्यांपूर्वी फूट पडली. त्यानंतर शिवसेनेतील अनेक खासदार, आमदार एकनाथ शिंदे गटात सामील झाले. या राजकीय घडामोडीनंतर या दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एक संधीही सोडली जात नाही. त्यातच आता शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांच्याविरोधात लढण्याची मागणी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
शिवसेनेने हातकणंगले मतदारसंघात विजय मिळवला होता. त्यावेळी धैर्यशील माने हे ठाकरे यांच्या शिवसेनेत होते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर माने शिंदे गटात सहभागी झाले. पण आता मुरलीधर जाधव यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार माने यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याची माहिती दिली जात आहे.
दरम्यान, मुरलीधर जाधव यांनी केलेल्या या मागणीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडे लोकसभा लढण्याची पहिली मागणी कोल्हापुरातून आली आहे. यावर आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.