मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघेही राजकीय फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. हे देशाने अनेकदा पाहिले आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली.
चलनी नोटांवर देवी-देवतांचे फोटो छापण्याच्या मागणीवरून राजकारण तापत आहे. त्यातच आता नाना पटोले यांनी केजरीवाल आणि मोदी यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, अरविंद केजरीवाल मोदींच्या मदतीला धावले असून, बुडणाऱ्या अर्थव्यवस्थेवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी नोटांना धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. केजरीवालांच्या चेहऱ्यावरील बुरखा आता फाटला असून, त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, गुजरात निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी केजरीवाल आता चलनी नोटा आणि अर्थव्यवस्थेला धार्मिक रंग देत आहेत. केजरीवाल यांना या संदर्भातील कायदे आणि नियम माहीत असूनही अशी मागणी करून ज्वलंत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अर्थव्यवस्था रसातळाला
मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. दिवसेंदिवस रुपयाचे अवमूल्यन होत आहे. महागाईचा आगडोंब उसळला आहे. बेरोजगारी 45 वर्षातील उच्चांकी पातळीवर आहे. जनता निराश असून, देशात सरकारविरोधात संतापाचे वातावरण आहे, असेही पटोले म्हणाले.