मुंबई | शिवसेना नेते सुभाष देसाई (Subhash Desai) हे उद्योगमंत्री असताना त्यांनीच फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार नाही, असे म्हटल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यानंतर माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी थेट पुरावे देत सर्व आरोप खोडून काढले. ‘फडणवीस यांनी आज जुनी बातमी दाखवून महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे,’ असे ठाकरे म्हणाले.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वेदांता आणि फॉक्सकॉन या कंपन्यांच्या सेमीकंडक्टर प्रकल्पावरून तत्कालीन ठाकरे सरकारवरच टीकास्त्र सोडले होते. त्यावर आदित्य ठाकरे यांनी पुरावे देऊन फडणवीसांचे सर्व आरोप खोडून काढले. आदित्य ठाकरे म्हणाले, ‘आजच्या पत्रकार परिषदेत जितकं खोटं बोललं गेलं तितकं खोटं मी याआधी कधीही ऐकलं नव्हतं. फडणवीस यांना त्यांच्या टीमकडून चुकीची माहिती दिली गेली असेल. उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, सुभाष देसाई हे उद्योगमंत्री असताना त्यांनीच सांगितलं होतं की फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार नाही. मात्र, देसाई यांनी ते विधान एका जुन्या प्रकल्पाबाबत केलं होतं. तो पूर्णपणे वेगळा होता’.
दरम्यान, वेदांता कंपनीने 14 मेला एक सविस्तर गुंतवणूक अर्ज महाराष्ट्र सरकारला पाठवला होता. यामध्ये केंद्र आणि महाराष्ट्र सरकारची गुंतवणूक कशी असेल हे सांगितले होते. अशी सगळी प्रक्रिया पुढे सुरू असताना गद्दारी करून महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात आले. त्यानंतर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी वेदांता-फॉक्सकॉनला एक पत्रही लिहिले होते. मात्र, अखेर सप्टेंबर महिन्यात हा प्रकल्प गुजरातला गेल्याचे स्पष्ट झाल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.