पुणे : कोरोना महामारीचं संकट कमी झाल्यानंतर यावर्षी महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव दणक्यात होताना दिसत आहे. दहीहंडीचा उत्सव विशेष करून मुंबई, ठाणे, पुणे परिसरात जोरदार होत असतो. यावर्षी तो दोन वर्षांच्या खंडानंतर होत असून, तो मुंबई, पुणे, नवी मुंबईसह इतर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दहीहंडीला कधी नव्हे इतके राजकीय स्वरुप आल्याचे पाहायला मिळत आहे.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रात नुकतेच शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले आहे. नुकताच मंत्रिमंडळ विस्तार झाला असून शिवसेनेतील ठाकरे व शिंदे गट एकमेकांसमोर उभा राहिले आहेत. भाजपा शिंदे गटाच्या बाजुने उभा असून आजच्या दहीहंडी उत्सवात या सर्व राजकारणाचे प्रतिबिंब दिसत आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर कुरघोडी करण्यात सध्या तरी भाजपासह शिंदे गट यशस्वी होताना दिसत आहे. दहीहंडीच्या निमित्ताने अदित्य ठाकरे आमदार असलेल्या वरळी मधील जांबोरी मैदान भाजपाने अगोदरच बुक केल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाला मैदान मिळविण्यात नामुष्की ओढावल्याचे पाहायला मिळाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक नेते मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह इतर ठिकाणच्या महत्वाच्या दहीहंडी उत्सवांना प्रत्यक्ष भेटी देत आहेत. विरोधी पक्षाकडूनही शिवसेनेचे अदित्य ठाकरे भेटी देताना दिसत आहेत. ठाण्यामध्ये मनसेची दहीहंडी जोरात होताना दिसत आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात देखील हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. मध्यवर्ती शहरातील सुवर्णयुग मित्र मंडळ, गुरुजी तालीम यासह आणि कोथरुड, बाणेर-बालेवाडी, वडगावशेरी, धायरी, कात्रज, हडपसर आदी उपनगरांमध्ये दहीहंडी उत्सवाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडी उत्सवातून राजकीय शक्ती प्रदर्शनाचे थरावर थर लागलेले दिसत आहेत.