मुंबई | बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार संजय बांगर (Sanjay Bangar) यांनी मंत्रालयाच्या गेटवरील पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘मला ओळखत नाही का?’, असा सवाल तेथे उपस्थित पोलिस कर्मचाऱ्याला करत त्यांनी शिवीगाळ केल्याचे म्हटले जात आहे.
संजय बांगर हे त्यांच्या 15 कार्यकर्त्यांसोबत मंत्रालयात जात होते. त्यावेळी गेटवर त्यांना पोलिस कर्मचाऱ्याने अडवले. तेव्हा पोलिस कर्मचाऱ्याने कार्यकर्त्यांचा पास काढण्यास सांगितले आणि त्यावेळी संजय बांगर संतापले. त्यांनी त्या कर्मचाऱ्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. ‘आपल्याला ओळखत नाही का?’ अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांनी पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळही केल्याचे म्हटले जात आहे. २७ ऑक्टोबरला ही घटना घडल्याची माहिती आहे. दरम्यान, या पोलिस कर्मचाऱ्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे. मात्र, संजय बांगर यांनी त्यांच्यावरील हे आरोप फेटाळले आहेत.
…तर सीसीटीव्ही कॅमेरे तपासा
काही कार्यकर्त्यांसोबत मी मंत्रालयात जात असताना तेथील पोलिस कर्मचाऱ्याने डायरीत प्रवेशाची नोंद करण्यास सांगितलं. यावेळी एका कार्यकर्त्याने सोबत आमदार असल्याचं सांगितलं. त्या कर्मचाऱ्याने मला ओळखलं नव्हतं. पण ओळखल्यानंतर सन्मानाने मला आत पाठवलं. माझ्या पीएने नंतर डायरीत नोंद केली. आम्ही कोणतीही हुज्जत घातली नाही, असे म्हणत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच हुज्जत घातली असेल तर सीसीटीव्ही कॅमेरे तपासा, असेही त्यांनी सांगितले.