मुंबई | राज्यात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यात शिवसेना पक्ष फुटीनंतर शिंदे गट वेगळा झाला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने शिवसेनेतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते फोडले आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गटातील हजारो कार्यकर्ते शिंदे गटात सहभागी झाले आहेत. इतक्या मोठ्या स्वरूपात कार्यकर्ते गेल्याने मनसेसह ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
आत्तापर्यंत फक्त शिवसेना नाही, तर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यातच आता शिंदे गटाने ठाकरे बंधूंना मोठा धक्का दिला असून, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमधील शेकडो पदाधिकारी, हजारो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात सामील झाल्याची माहिती देण्यात आली आहे. शिवसेना आणि मनसेच्या असे एकूण साडेतीन हजार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे म्हटले जात आहे. हे सर्व कार्यकर्ते पालघर, बोईसर आणि डहाणू विधानसभा मतदारसंघातील असल्याची माहिती आहे.
दरम्यान, यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर आता मनसेचेही हजारो कार्यकर्ते शिंदे गटात सहभागी झाले आहे. त्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला असून, यावर पक्षाचे प्रमुख राज ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणे गरजेचे आहे.