मुंबई | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हासंबंधी दाखल याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
शिवसेना पक्षफुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट वेगळे झाले. शिंदे गटाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर दावा केला होता. त्यानंतर हा वाद न्यायालयात गेला होता. उद्धव ठाकरे यांच्या वतीने निवडणूक आयोगाच्या एका आदेशाला स्थगिती देण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
‘मी पक्षप्रमुख आहे, 30 वर्षे पक्ष चालवलेला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण गोठवण्याचा घेतलेला निर्णय केवळ प्रथमदर्शनी समोर आलेल्या मुद्यांच्या आधारे घेतला आहे. हा आधार समाधानकारक असू शकत नाही. त्यामुळे निवडणूक आयोग पक्ष नाव व निवडणूक चिन्ह गोठवू शकत नाही, असा युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला होता.