मुंबई | ‘किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी माझ्यावर मुद्दाम आरोप केले आहेत. नारायण राणे (Narayan Rane) यांच्या घरावरही कारवाई केली आहे. तिकडे सोमय्या हातोडा घेऊन जात नाहीत. साई रिसॉर्ट बांधण्यास सरकारनेच परवानगी दिली होती, अशी माझी माहिती आहे. जर सरकारने दिलेली परवानगी चुकीची असेल तर त्यात मालकाचा दोष किती आहे, हे तपासावे लागेल, असे माजी मंत्री आणि शिवसेना (उ.बा.ठा.) नेते अनिल परब यांनी सांगितले.
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्याच्या कामास सुरुवात झाल्याचा दावा केला आहे. यातील विशेष बाब म्हणजे त्यांनी प्रतिकात्मक हातोडा हातात घेत परबांशी संबंध असलेले रिसॉर्ट जमीनदोस्त होणार, असे सांगितले आहे. मात्र, या दाव्यानंतर अनिल परब यांनी सोमय्यांना थेट आव्हान दिले आहे.
ते म्हणाले, ”ज्यांनी शिंदे गटात प्रवेश केला, त्यांच्याबाबत सोमय्या एकही शब्द बोलत नाहीत. सोमय्या यांनी माझ्यावर मुद्दामहून आरोप केले आहेत. नारायण राणे यांच्या घरावरही कारवाई केली आहे. तिकडे सोमय्या हातोडा घेऊन जात नाहीत. साई रिसॉर्टच्या बाजूला आणखी एक रिसॉर्ट आहे. तो माणूस गरीब आहे. त्याचा तर काहीही संबंध नाही”.
रिसॉर्टचा मालक मी नाही…
साई रिसॉर्टचा मालक मी नसून, सदानंद कदम आहेत. ही मालकी त्यांनी कागदोपत्री सिद्ध केलेली आहे. महसूल विभागाच्या सर्व कागदपत्रांत त्यांचे नाव आहे. ज्या नोटिशी आलेल्या आहेत, त्यादेखील त्यांनाच आलेल्या आहेत. मात्र, जाणूनबुजून किरीट सोमय्या माझा संबंध या रिसॉर्टशी लावत आहेत, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.