मुंबई | गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (उ. बा. ठा.) हे दोन्ही पक्ष आगामी निवडणुकीत एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर (Rekha Thakur) यांनी शिवसेना-वंचित एकत्र येणार असल्याची माहिती दिली.
शिवसेना पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन पक्षाबाहेर पडले. त्यानंतर शिवसेनेतील अनेक आमदार, खासदार बाहेर पडले आहेत. शिवसेनेला साथ देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने तसा प्रस्तावही दिला होता. त्यावर आता सकारात्मक चर्चा झाल्याचे रेखा ठाकूर यांनी सांगितले.
रेखा ठाकूर यांनी सांगितले की, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी हे एकत्र येण्याच्या भूमिकेमध्ये एकमतावर आले आहेत. आम्ही सकारात्मक आहोत. बोलणी पुढे गेली असून, वंचितच्या तीन प्रतिनिधींची सुभाष देसाईंसोबत दोन बैठका घेतल्या आहेत. बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे.
ठाकरे-आंबेडकर एकाच मंचावर
गेल्या काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि अॅड. प्रकाश आंबेडकर हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर दिसले होते. त्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यात आता उद्धव ठाकरे आणि अॅड. आंबेडकर हे एकत्र येणार आहेत.