मुंबई | मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांना महाराष्ट्राचा अपमान करायचा आहे. आता त्यांनी जे वक्तव्य केले आहे, त्याबद्दल त्यांना माफी मागावीच लागेल. जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, अशा इशारा शिवसेनेचे (उ.बा.ठा.) खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी दिला.
मंगल प्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यानंतर खासदार सावंत यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये खासदार सावंत म्हणाले, त्यांना महाराष्ट्राचा अपमान करायचा आहे. आता त्यांनी जे वक्तव्य केलंय त्याबद्दल त्यांना माफी मागावीच लागेल. मंगलप्रभात लोढा जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आज आम्ही लोढांना चौथीच्या इतिहासाचे पुस्तक भेट देत आहोत. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिलेला आहे. ज्यांना इतिहास माहिती नाही त्यांना आम्ही इतिहास शिकवत आहोत.
दरम्यान, जोपर्यंत भाजपचे नेते छत्रपतींच्या अपमानाबद्दल पश्चाताप व्यक्त करत नाहीत, तोपर्यंत उभ्या महाराष्ट्रात यापुढे भाजपचा कुठलाही नेता फिरू शकणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.