मुंबई | गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील अनेक नेतेमंडळी शिंदे गटात प्रवेश करत आहेत. त्यात अनेक वरिष्ठ नेत्यांचाही समावेश आहे. त्यामध्ये आता माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांनी भाष्य केले. ‘मी पहिल्यापासून आणि आतापर्यंत शिवसेनेत आहे, मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत सातत्याने उभा आहे’, असे ते म्हणाले.
शिवसेना पक्षफुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट वेगळे झाले. अनेक आमदार, खासदार, पक्षातील नेतेमंडळी ठाकरे गटातून बाहेर पडले. यामध्ये निष्ठावान समजल्या जाणाऱ्या अनेकांचा समावेश आहे. पण आता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी ठाकरे गटातच राहणार असल्याचे म्हटले आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, मनोहर जोशी म्हणाले, माझं रक्त शिवसेनेचं आहे. आधी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास, नंतर उद्धवजींचा सहवास, मी महाराष्ट्र, शिवसेनेसाठी आहे. शिवसेना ही संघटना महाराष्ट्रावर अतोनात प्रेम करते.