बुलढाणा | भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माबाबत विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर वादंग निर्माण होत असतानाच आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी लाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ‘प्रसाद लाड हे पाकिस्तानात जन्माला आले का? हे तपासावे लागेल’, असे ते म्हणाले.
आमदार लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला होता, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर टीका केली जात आहे. यापूर्वी माजी खासदार संभाजीराजे यांच्यासह इतर नेत्यांनी लक्ष्य केले होते. त्यानंतर आता सत्तेत एकत्र असलेल्या शिंदे गटाच्या आमदाराने भाजप आमदाराच्या विधानाचा समाचार घेतला.
दरम्यान, माजी खासदार संभाजीराजे यांनी लाड यांच्या विधानावर तीव्र संताप व्यक्त केला. ‘जरा तरी लाज ठेवा. त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणे मूर्खपणा आहे. त्यांच्यावर शिवभक्त हसत आहेत’, असे म्हटले होते. त्यानंतर आता आमदार गायकवाड यांनी लाड यांना धारेवर धरले आहे.