मुंबई | कर्नाटक-महाराष्ट्र राज्यात सीमाप्रश्नावरून वाद निर्माण झाला आहे. त्यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले. ‘कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये. महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास, असले प्रकार सुरु आहेत ते तात्काळ थांबवा’, असे राज ठाकरे म्हणाले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील 40 गावांवर दावा केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच महाराष्ट्रातील मंत्र्यांना कर्नाटकात मनाई केल्यानेही मराठी माणसाकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. त्यातच महाराष्ट्रातील वाहनावर बेळगावात झालेली दगडफेक या सर्व घडामोडीनंतर मनसे आक्रमक झाला.
राज ठाकरे म्हणाले, ‘मी मध्यंतरी बोललो तसं महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद उफाळून यावा, यासाठी पुन्हा कोणाकडून तरी प्रयत्न सुरु झाले आहेत. तेथून कोण खतपाणी घालतंय हे तर उघड दिसत आहे. मात्र, इथे कोण या खतपाणी घालत आहे का? हे सरकारने पाहायला हवे. असे म्हणत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये, असेही म्हणाले.