पुणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) पुण्यात येत आहेत. त्यांच्या पुणे दौऱ्याची माहिती मिळाल्यानंतर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना विशेष सूचना दिल्या आहेत.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून ब्रिजभूषण यांनी जोरदार विरोध केला होता. तेच ब्रिजभूषण पुण्यात येणार आहेत. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना ब्रिजभूषण सिंह यांच्या हस्ते लावण्यात येणार आहे. ब्रिजभूषण हे पुण्यात येणार असल्याने त्यांना मनसेकडून विरोध होईल, असे म्हटले जात होते. पण आता मनसेने भूमिका जाहीर केली. याबाबत माहिती देताना वसंत मोरे म्हणाले, ‘आता मनसे ब्रिजभूषण सिंह यांना कोणताच विरोध करणार नाही. खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच यासंदर्भातील आदेश दिले आहेत’.
दरम्यान, राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या आंदोलनामुळे ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली होती. तेच ब्रिजभूषण आता पुण्यात येत आहे.