मुंबई | राज्य सरकारने पोलीस हवालदार या पदासाठी आता तृतीयपंथी देखील ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरू शकणार आहेत. त्यामुळे राज्य सरकार मागील अर्जात सुधारणा करणार असून लिंग या श्रेणीत तृतीयपंथी हा पर्याय समाविष्ट करण्यात येणार आहे. तसेच अर्ज भरण्याची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. तृतीयपंथी उमेदवारांच्या शारीरिक चाचणीसाठी पुढील वर्षाच्या फेब्रुवारीपर्यंत निकष ठरविण्यात येतील, अशी माहिती उच्च न्यायालयात दिली.
पोलिस हवालदार पदासाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी भरती प्रक्रियेत तृतीयपंथींसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत अपयशी ठरल्याप्रकरणी राज्य सरकारची उच्च न्यायालयाने कानउघडणी केली होती.
त्यानंतर या मुद्दयावर मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. अभय अहुजा यांच्या खंडपीठापुढे पुन्हा सुनावणी झाली. महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी राज्य सरकार ऑनलाइन अर्जात सुधारणा करणार आहे. लिंग या श्रेणीत तृतीयपंथींचाही समावेश करणार आहे. त्याशिवाय सध्याच्या भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांसाठी दोन पदे राखीव ठेवण्यात येणार आहेत, असे न्यायालयाला सांगितले.
दरम्यान, अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. १३ डिसेंबरपर्यंत तिसरा पर्याय उपलब्ध करण्यात येणार आहे.