सांगली | ”विकासाचा आणि या सरकारचा काही संबंध नाही. हे सरकार आमदारांना मॅनेज करणारे आहे. जनतेशी यांना काहीही देणे-घेणे नाही”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Pail) यांनी केली. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात ते माझे ट्विट नव्हे. हे किती धादांत खोटे आहे. हा खोटेपणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निमूटपणे सहन करत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आता जयंत पाटील यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ”विकासाचा आणि या सरकारचा काही संबंध नाही. हे आमदार मॅनेज करणारे सरकार आहे. जनतेशी यांना काही देणे-घेणे नाही. कर्नाटकात निवडणूक आहे म्हणून आता सीमावाद काढला जात आहे. सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने मांडलेली भूमिका ही महाराष्ट्राच्या विरोधातीलच आहे. ती महाराष्ट्राच्या हिताची भूमिका नाही. निवडणूक पार पडत नाही तोपर्यंत हा वाद असाच ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री केंद्राला शरण गेलेत का?
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दारात गेल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात ते ट्विट त्यांचे नाही. ट्विट त्यांचे नसेल तर मग ते अद्याप डिलीट कसे झाले नाही? ज्या दिवशी ट्विट आले त्यादिवशी त्यांनी स्पष्टीकरण द्यायला हवे होते. हा जाब आमच्या मुख्यमंत्र्यांनी विचारला नाही त्यामुळे आमचे मुख्यमंत्री केंद्राला शरण गेले आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.