मुंबई | छत्रपती संभाजी महाराज यांच्या विधानावर भूमिका मांडण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी काहीही कारण नसताना माझ्याविरोधात वाद निर्माण केला गेला, असे म्हटले आहे.
अजित पवार यांनी केलेल्या विधानानंतर भाजप आणि त्यासंबंधी संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला. काही ठिकाणी आंदोलने, मोर्चे काढण्यात आले. मात्र, त्यानंतर आता अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, संभाजीराजेंना स्वराज्य रक्षक असंच म्हणावं ही माझी भूमिका आहे. मात्र, शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे जे धर्मवीर म्हणतात तो त्यांचा प्रश्न आहे.
तसेच मी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जेव्हा काम करत होतो तेव्हा मी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी 11 मार्च 2022 रोजी मी सुरूवात करताच मी स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचा आज स्मृतीदिन. त्यांचं स्मारक उभारलं जावं अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे माझ्या विरोधात काहीही कारण नसताना वाद निर्माण केला गेला, असेही अजित पवार यांनी सांगितले.
मला काहीही सांगू नये…
तुम्ही जर तुमच्या मोबाईलमध्ये धर्मवीर शब्द शोधलात तर जवळपास सात-आठ लोकं आहेत, ज्यांना धर्मवीर म्हटलं गेलं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्याचे रक्षक संभाजी महाराज होते. ज्यांना माझी भूमिका पटत नाही त्यांनी सोडून द्या. बाकीच्यांनी मला काहीही सांगू नये, असेही ते म्हणाले.