मुंबई | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. असे असताना आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) हे राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. यावरुन आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेना पक्षफुटीनंतर राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन झाले. शिवसेनेचे अनेक नेतेमंडळी शिंदे गटात गेली. त्यामध्ये शंभूराज देसाई हे देखील आहेत. त्यानंतर आता पार्थ पवार यांनी शंभूराज देसाई यांची भेट घेतली आहे. पण या भेटीमागचे कारण अद्याप समजू शकले नाही.
सध्या राज्यात शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत, तर दुसरीकडे पुण्याच्या माजी महापौर आणि भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीची चर्चा सध्या सुरू असताना पार्थ पवार यांनी शंभूराज देसाई यांची भेट घेतली.