बुलढाणा | सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. अशातच बुलढाणा जिल्ह्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याची माहिती मिळाली आहे. आज सकाळी १०.३० वाजल्यापासून सोशल मिडीयावर देखील हा पेपर व्हायरल झाला आहे. सगळीकडे या पेपरची चर्चा आहे.
सिंदखेडराजा येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला आहे. याबाबतची अधिकृत माहिती प्रशासकीय यंत्रणेकडून मिळालेली नाही. बोर्डानेदेखील पेपरफुटीला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
विद्यार्थ्यांकडे याआधी यवतमाळ येथे इंग्रजी विषयाचा पेपर फुटला होता. तर हिंदी पेपरमध्ये चुका झाल्याचे पुढे आले होते. तर इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करणाऱ्या परभणीतील सहा शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता खरंच पेपर पोहोचला होता का? याबाबत यंत्रणा तपास करत आहे.
दरम्यान, यंदा कॉपीमुक्त परीक्षा पार पडण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यानुसार अधिकाधिक प्रयत्न देखील सुरु आहेत परंतु जर अशा काही घटना घडत असतील तर, विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.