मुंबई | सध्या वातावरणात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. कधी उन्हाचा तडाखा तर कधी अवकाळी पाऊस नागरिकांना सहन करावा लागतोय. एकीकडे राज्यावर उष्णतेच्या लाटेचं संकट असताना दुसरीकडे वीजेच्या मागणीतही रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे. राज्यात मंगळवारी विजेच्या मागणीनं उच्चांक गाठला आहे. तब्बल 29 हजार 116 मेगावॅट वीजेची मागणी नोंदवली गेली आहे.
महावितरणच्या ग्राहकांची आजवरची ही सर्वाधिक वीज मागणी आहे. एसी, पंखे, कुलरचा वापर सर्वत्र वाढला आहे त्यामुळेच विजेची मागणी देखील वाढलेली पाहायला मिळत आहे. एप्रिल २०२२ मध्ये 24 हजार 996 मेगावॅट नोंदवण्यात आली होती. हा आकडा आता 25 हजार 100 मेगावॅट झाला आहे. राज्यभरात उष्णतेची लाट पाहता 18 एप्रिलला दुपारी तीनच्या दरम्यान महावितरणची वीजमागणी 25 हजार 437 मेगावॅटच्या विक्रमी स्तरावर पोहचली होती.
मुंबईची वीज मागणी ही 3678 मेगावॅटवर पोहचली तर राज्यभरातील वीज मागणी 29,116 मेगावॅट पर्यंत पोहचली आहे. विना भारनियमन कुठल्याही अडथळ्याशिवाय ही वीज अखंड स्वरूपात वीज वितरण कंपन्यापर्यंत पोहोचण्याचे काम महापारेषण कंपनीने व तिथून ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे काम वीज वितरण कंपन्यांनी केले आहे.
दरम्यान, बहुतांश शहारात तापमानाचा पारा हा 40 ते 44 अंश सेल्सिअसच्या आसपास गेला आहे. देशातील पूर्व भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात तापमान चाळीशी पार गेल्यानं काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.