सांगली | व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल दि पूना मर्चंट्स चेंबरला राज्यस्तरीय बिझनेस एक्स्प्रेस पुरस्काराने गौरवण्यात आले. दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत हा पुरस्कार स्वीकारला.
दि पूना मर्चंट्स चेंबरचे यंदा अमृतमहोत्सवी वर्ष आहे. याचवर्षी चेंबरच्या कार्याचा गौरव केल्याने आमचा उत्साह आणखी वृद्धिंगत झाला आहे, या पुरस्काराने आणखी चांगले काम करण्याची ऊर्जा आम्हाला मिळणार आहे असे चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, सांगलीच्या बिझनेस एक्स्प्रेस फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी व्यापार, उद्योग, सहकार, बँकिंग, शैक्षणिक, सामाजिक आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
गेल्या ७५ वर्षांतील व्यापार आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल दि पूना मर्चंट चेंबरची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यावेळी चेंबरचे उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव रायकुमार नहार, सहसचिव ईश्वर नहार, संदिप शहा, हरिराम चौधरी, भरत भाटे आदी मान्यवर उपस्थित होते.