मुंबई | सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकच वाद चिघळला आहे. शिवसेनेच्या काल राज्यातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती छापून आल्या आणि तिथेच राजकारण तापलं त्यावर टीका झाल्यानंतर आज पुन्हा नव्यानं जाहिराती दिल्या पण यावरून आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत इतक्या प्रचंड खर्चाच्या जाहिराती देणारा शिवसेनेचा हितचिंतक कोण आहे? असा सवाल उपस्थित केला आहे.
आजची जाहिरात म्हणजे कालच्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये तुम्ही भाजप आणि शिवसेनेचा जाहिरातीत उल्लेख केला आहे तर मग फक्त शिवसेनेच्या ९ मंत्र्यांची माळ लावली आहे. भाजपच्या मंत्र्यांचे फोटो का टाकले नाहीत? ज्या नऊ मंत्र्यांची माळ लावली आहे, त्यातील ५ मंत्री हे वादग्रस्त आहेत. दोन दिवसांपासून यांच्याविरोधात माध्यमातून सातत्यानं बातम्या सुरु आहेत. मग अशा वादग्रस्त मंत्र्यांच्या कारभारावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे का? असे पवार म्हटले आहेत.
हे सगळं घडत असताना कालच्या जाहिरातीबाबत शिवसेनेच्या एका मंत्र्यानं सांगितलं की, त्यांच्या एका हितचिंतकानं ही जाहिरात दिली आहे. कोण हितचिंतक आहे? पहिल्या पानावर महत्वाच्या अनेक पेपरला जाहिराती दिल्या जातात. या जाहिरातीला किती खर्च येतो हे सर्वांना माहिती आहे. त्याच्याकडं कशा पद्धतीनं पैसा आला आहे? असंदेखील यावेळी पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जनतेच्या मनात काय आहे हे निवडणूक घेतल्यानंतरच आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. तुमच्या सरकारबद्दल तुम्हाला आत्मविश्वास असेल, इतकं जनतेचं पाठबळ असेल असं तुम्हाला वाटत असेल जाहिरातीच्या माध्यमातून तुम्ही ते दाखवू इच्छित असाल तर निवडणुकीला सामोरं जा. तुम्हाला मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद मिळाले पण इतरांना २३ जागा खाली आहेत त्याबद्दल तुम्ही का बोलत नाही? असा सवालही पवारांनी उपस्थित केला आहे.