मुंबई | आज सकाळपासून ढगाळ वातावरणसह काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
गेले अनेक दिवस नागरिकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागला गेल्या वर्षीचा तुलनेत यावर्षी पावसाने उशीरा हजेरी लावली. त्यामध्ये अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान देखील झाले. आज राज्यात मुंबई, विदर्भासह कोकण, पुणे परिसरात पाऊस येत आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना देखील काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे.
गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने गडचिरोली परिसरात हजेरी लावली. त्यामुळं उकाड्यानं त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकरी राजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या असताना पाऊस आल्याने शेतकरी देखील सुखावला आहे.
दरम्यान, खरीप पूर्व मशागतीची कामं पूर्ण झाली असून, पेरणीसाठी शेतकरी सज्ज आहेत. मोठ्या प्रतीक्षेनंतर चिपळूणमध्ये देखील मान्सूनच्या सरी बरसल्या आहेत.