भगीरथ भालकेंचा BRS मध्ये प्रवेश
पंढरपूर | आषाढी वारीचे औचित्य साधून तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आज पांडुरंगाच्या चरणी लीन झाले आहेत. पंढरपूरमध्ये दाखल होताच आपल्या सहकार्यांसमवेत त्यांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं आहे. तर आमदार खासदार यांना मात्र बाहेरूनच विठुरायाचं दर्शन घ्यावं लागलं. पंढरपुरात वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्यामुळं मोजक्याच कोअर कमिटीच्या लोकांना के चंद्रशेखर राव यांच्यासोबत मंदिरात सोडण्यात आलं होतं.
काल केसीआर यांच्यासोबत त्यांचं अख्ख मंत्रिमंडळ सोलापुरात आले होते. आज सकाळी केसीआर यांच्या ताफा पंढरपूरकडे रवाना झाल्या होत्या. केसीआर यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. या वारीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती या पक्षाचा मोठा विस्तार करण्याची तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर यांची योजना आहे. त्यासाठी ते दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी सुरु झालेल्या केसीआर यांच्या या दौऱ्याला मोठं महत्व प्राप्त झालं आहे. तेलंगणातून तब्बल 600 गाड्यांचा ताफा महाराष्ट्रात दाखल झाला आहे.
विठुरायाचे दर्शन घेतल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा ताफा पंढरपूरहून सरकोलीच्या दिशेनं निघाला आहे. तर सरकोली इथं त्यांचा शेतकरी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांचा BRS मध्ये प्रवेश होणार आहे. केसीआर यांच्या स्वागतासाठी भगीरथ भालके यांच्याकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यांच्या स्वागतासाठी गुलाबाच्या पायघड्या आणि अबकी बार किसान सरकारचा रांगोळीतून संदेश देण्यात आला आहे.
दरम्यान, केसीआर यांचे विठ्ठल-रखुमाईची मूर्ती, तुळशीहार, टाळ-चिपळ्या आणि वीणा देऊन स्वागत केलं जाणार आहे. तर सर्व आमदार आणि मंत्र्यांना देखील विठ्ठलाची मूर्ती दिली जाणार आहे.