मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला विषय म्हणजे खातेवाटप. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या 9 आमदार सामील होत मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीला एक आठवडा पूर्ण होऊनही नव्या मंत्र्यांना खातेवाटप झालं नाही. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अर्थ, महसूल, सहकार, जलसंपदा, अन्न व नागरी पुरवठा अशी खाती मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, फडणवीस यांनी मध्यममार्ग काढून राष्ट्रवादीला अन्य खाती देण्यास मान्यता दिली आहे.
अजित पवार यांना ‘अर्थ’ खाते देण्यास मुख्यमंत्री शिंदे-फडणवीस यांच्यात एकमत झाल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मात्र, पवारांना अर्थ खाते देण्यास शिंदे गटाच्या मंत्र्याचा विरोध होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हा विरोध कमी करण्यात यश मिळाले आहे असेही या सूत्रांनी सांगितले.
सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 10 आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपचे 10 असे एकूण 20 मंत्री होते. त्यात राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतल्याने ही संख्या 29 इतकी झाली आहे. विशेष म्हणजे या सर्व मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती द्यायची यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चा सुरु होती. अखेर, कुणाला कोणते खाते द्यायचे यावर तिन्ही नेत्यांचे एकमत झाले आहे. त्यामुळे आजच नवीन मंत्र्यांना खातेवाटप होण्याची शक्यता आहे असे या सूत्रांनी सांगितले. तसेच, नव्याने खातेवाटप करण्यात येणार असून काही मंत्र्यांची खाती कमी करण्यात येणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 13 खात्यांचा पदभार आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, अर्थ, जलसंपदा, गृहनिर्माण, ऊर्जा आणि राजशिष्टाचार अशा सहा महत्वाच्या खात्यांचा पदभार समावेश आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेले ‘अर्थ’ हे महत्वाचे खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात येणार आहे असे या सूत्रांनी सांगितले आहे. तर खातेवाटपाच्या यादीवर आज रात्री अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोणाला कोणतं खातं?
छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा, ओबीसी, बहुजन विकास
दिलीप वळसे पाटील – सहकार
धनंजय मुंडे – सामाजिक न्याय
अदिती तटकरे – महिला व बालविकास
हसन मुश्रीफ – वस्त्रोद्योग, अल्पसंख्याक विकास
संजय बनसोडे – क्रीडा
अनिल पाटील – पशु व वैद्यकीय
धर्मराज बाबा आत्राम – आदिवासी कल्याण