अंतरवाली सराटी | गेल्या 17 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांनी सुरू केलेले उपोषण आज अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे. यावेळी मुख्यंमत्री शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांची उपस्थिती लावली आहे. जरांगे पाटलांनी मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन आपले उपोषण मागे घेतलं आहे.
यावेळी सरांगे पाटलांनी बोलताना, आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकारला मी एक महिन्याचा अवधी देत आहे याउलट आणखी 8 दिवस वाढीव देईल मात्र मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे असं म्हणाले आहे. जरांगे पाटलांची मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्तेच आपण उपोषण मागे घेणार असल्याची त्यांची भूमिका होती. त्यामुळे अखेर मुख्यंमत्री शिंदे अंतरवाली गावात दाखल झाले त्यानंतर शिंदे आणि जरांगे पाटील यांच्यात १५ मिनिटे चर्चा झाली आणि अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे उपोषण मागे घेण्याची विनंती केली. हे आमरण उपोषण मागे घेतलं असले तरीही साखळी उपोषण मात्र सुरूच राहणार असल्याचं जरांगे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना, मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सरकार कुणावरही अन्याय करणार नाही. रद्द झालेलं आरक्षण पुन्हा मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मराठ्यांना टिकणारं आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे असं म्हणलं आहे.
दरम्यान, जरांगे पाटलांवर पुन्हा उपोषणाची वेळ येणार नाही असंदेखील शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचंही शिंदे यांनी म्हटलं आहे.