अहमदनगर | धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी गेल्या 20 दिवसांपासून सुरु असलेले आंदोलन आज अखेर 21व्या दिवशी मागे घेण्यात आले आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांची शिष्टाई देखील यशस्वी ठरली आहे.
अहमदनगर येथील चौंडीमध्ये यशवंत सेनेच्यावतीने धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीतील आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी हे आंदोलन सुरु होतं. आज 21व्या दिवशी उपोषणकर्ते सुरेश बंडगर आणि अण्णासाहेब रुपनवर या दोघांचीही प्रकृती बिघडली. काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांशी फोनवरुन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि आज त्यांनी हे उपोषण मागे घेतलं आहे.
दरम्यान आज मंत्री महाजनांनी चौंडीतील उपोषणकर्त्यांशी चर्चा केली त्यांनी सरकारची भूमिका उपस्थितांना समजावून सांगितली. आंदोलकांचे समाधान झाल्याने अखेर उपोषण मागे घेण्यात आले.
उपोषणकर्त्यांना ‘हे’ मिळालं
धनगर आरक्षणसंदर्भात सरकार आणि यशवंत सेनेच्या शिष्टमंडळाशी 21 सप्टेंबर रोजी चर्चा झाली. काही तांत्रिक आणि न्याय प्रविष्ट बाबी सोडवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. त्याचबरोबर आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात दाखल झालेले आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली आणि ती मान्य करण्यात आली असून गुन्हे मागे घेण्यात येणार आहे असे गिरीश महाजन यांनी सांगितले.
१)धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी आवश्यकता भासल्यास उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येईल.
२) 50 दिवसांत आरक्षणाबाबतच्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये माहिती जमवण्यासह कायदेशीर मार्गाबाबत चर्चा होणार आहे.
3)धनगर समाजासाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी होती. ती देखील पूर्ण करण्यात येणार असून योजना लागू करण्यात येणार आहे.