पुणे | खान्देशातील दबदबा असलेलं नेतृत्व म्हणजे डॉ उल्हास पाटील. त्यांना काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांच्या मर्जीतल्या नेत्यांपैकी एक असल्याचं मानलं जातं. डॉ उल्हास पाटील हे जळगावच्या रावेर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या चिन्हावर 1998 साली खासदार म्हणून निवडून आले होते. गांधी परिवाराशी एकनिष्ठ असलेले उल्हास पाटील यांचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबन केले आहे. डॉ. उल्हास पाटील त्यांच्या पत्नी डॉ वर्षा पाटील या दोघांसह काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यावरही काँग्रेसतर्फे निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांनतर त्यांनी पत्रकार परिषेदेत बोलताना, काँग्रेसमध्ये एकाधिकारशाही सुरु असल्याची टीका करत नाना पटोले यांच्यावर हल्लाबोल चढवला.
काँग्रेसची गेल्या तीन दशकांपासून जिल्ह्यातील धुरा वाहणारे, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार असलेले डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या केतकी पाटील यांचा भाजपात प्रवेश होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या परंतु, आता डॉ उल्हास पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांना निलंबित केल्यानं मुंबईत एका सोहळ्या दरम्यान पाटील यांनी बुधवारी २४ जानेवारी रोजी आपली कन्या आणि समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी डॉ. केतकी पाटील यांची महिला प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली. भाजप प्रवेशामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत ते किंवा त्यांची कन्या डॉ. केतकी भाजपच्या तिकिटावर रावेर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
डॉ उल्हास पाटील भाजपात सामील झाल्यानं आता भाजपाची ताकद दुप्पटीने वाढणार आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना काँग्रेसला हा मोठा धक्का बसला आहे… जळगाव किंवा रावेर लोकसभा मतदार संघातून भाजपाकडून डॉ पाटील किंवा त्यांच्या मुलीला उमेदवारी मिळणार का हे पाहणं देखील उत्सुकतेचं असणार आहे…