पुणे। लोकसभेच्या निवडणुकीच्या काही दिवस अगोदर राज्यसभेतील रिक्त होणाऱ्या ५६ जागांसाठी निवडणूक होतेय आणि या ५६ जागा १५ राज्यांतल्या आहेत. त्यातल्या ६ जागा महाराष्ट्रातल्या आहेत आणि या सहापैकी तीन भाजपाच्या आहेत. त्यामुळं या तीनमध्ये पुणे शहरातून एकजण राज्यसभेवर पाठवा अशी भावना पुणे शहर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याची बातमी लोकमतमध्ये १ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाली. आणि या बातमीनंतर राज्यसभेवर पाठवायचं झालं तर, कुणाला पाठवायचं म्हणून जोरदार चर्चा सुरु आहे.लोकसभा निवडणूक लगेचच असल्यानं उमेदवार निवडून येणाच्या दृष्टीकोनातून पक्षातील काही इच्छुकांची राज्यसभेवर वर्णी लावली जाईल देखील. त्यामुळं लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या एखाद्या स्ट्राँग उमेदवाराला थंड करण्यासाठी देखील हा मार्ग निवडला जाऊ शकतो. आणि त्याचअनुषंगानं पुणे शहर भारतीय जनता पार्टी च्या वतीनं भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडं ही मागणी तर केली नाही ना म्हणून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
पुणे लोकसभा मतदार संघातून इच्छुक असलेल्या रथी महारथींमधून नेमकं कुणाला राज्यसभेवर पाठवायचं हे अद्याप समजलेलं नाही.पुणे शहर भाजपाचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणातात की, कुणाला पाठवायचं हा विचार पक्ष श्रेष्ठींनी करावा.तो अधिकार त्यांचा आहे. धीरज घाटे यांच्या प्रतिक्रियेनंतर प्रश्न उरतो तो म्हणजे पुण्यातून राज्यसभेवर पाठवला जाईल असा व्यक्ती कोण? म्हणजे तो एक जण कोण असेल.येत्या 27 फेब्रुवारीला राज्यसभा निवडणूकीसाठी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होईल याचं उत्तर कदाचित त्याअगोदर मिळेल.