नवी दिल्ली | राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरु यांच्यावर केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिउत्तर दिले आहे. पंतप्रधान देशाचा असतो, तो एका पक्षाचा नसतो तसेच मोदींनी चुकीची व्यवस्था स्वीकारली असल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे.
मोदींच्या भाषणात समाजात एकता निर्माण व्हावी असं काहीच नव्हतं तर केवळ विनोद होता. तसेच लोकशाहीमध्ये अधिकार महत्वाचे असतात, चुकीला चूक म्हणता आलं पाहिजे. चुकीचा कार्यक्रम असो वा चुकीचं काम असो.. चुकीला विरोध केला पाहिजे अशा शब्दात त्यांनी मोदींच्या भाषणाची चिरफाड केली.
पुढे बोलताना, पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान होते. नेहरूंनी देशाचा चेहरा बदलण्याचं काम केलं. त्यावेळी जवाहरलाल नेहरू आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. दिवंगत नेत्यांवर टीका योग्य नसल्याचे खडेबोल पवारांनी पीएम मोदींना सुनावले. त्याचबरोबर मोदींचं भाषण ऐकून दु:ख झालं असल्याचंही ते म्हणाले. इंदिरा गांधी असो, जवाहरलाल नेहरू यांचं प्रत्येकाचं देशासाठी विकासात योगदान आहे.
- सरकारी यंत्रणांचा गैरवापर
सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याची टीका शरद पवार यांनी केली. यावेळी त्यांनी झारखंडमधील मुख्यमंत्री जे एक वेगळी भूमिका घेत होते, त्यांचे उदाहरण दिले. सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जातो आहे. असहिष्णुता वाढली असून आपल्याला एकत्र येऊन संघर्ष करावा लागेल बेरोजगारी वाढली असल्याने वैफल्यग्रस्त लोकांची संख्या वाढत आहे. या मुद्द्यावर काम करावं लागेल, असेही त्यांनी सांगितले.