पुणे | पुण्यामध्ये राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयात पत्रकार निखील वागळे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, वकील असीम सरोदे यांचा ‘निर्भय बनो’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमाला जात असताना वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला होता. यात निखील वागळे जखमी झाले नसले तरी त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी भाजपचे शहाराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह ४३ पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
केवळ भाजपंच नाही तर कार्यक्रमप्रसंगी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी स्वतः निखिल वागळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे अरविंद शिंदे, उद्धव ठाकरे गटाचे संजय मोरे यांच्यासह सुमारे २५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, निखील वागळे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी पुण्यातील या कार्यक्रमाला विरोध केला होता. पोलिसांनी निखील वागळे यांना कार्यक्रमस्थळी न जाण्याचा सल्ला दिला होता. पण वागळे कार्यक्रमाला जाण्यावर ठाम होते. दांडेकर पुलाजवळील राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयाबाहेर भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात गोळा झाले होते. त्यांनी गोंधळ घालण्याचाही प्रयत्न केला.
वागळे जेव्हा कार्यक्रमाला निघाले तेव्हा, दबा देऊन बसलेल्या भाजप कार्यकर्त्यांना त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने वागळे यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
याप्रसंगी महायुती आणि महाआघाडीचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला होता. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.