मराठ्यांत पुन्हा अस्वस्थता !
मराठा आरक्षणासाठी ९ ऑगस्ट २०२३ पासून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे वारंवार उपोषण करत आहेत. जरांगे पाटील हे पुन्हा अंतरवली सराटीत आमरण उपोषणाला बसले आहेत. 15 फेब्रुवारीपासून राज्य सरकारने आरक्षणाच्या प्रश्नी विशेष अधिवेशन बोलावलं असलं तरीही जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा मराठा समाजाला लाभ होत नाही आणि जोवर सग्या सोयऱ्यांचा कायदा पारित होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार अशी त्यांची भूमिका आहे. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात आले नाहीत. शिंदे समिती मराठवाड्यात काम करत नाही अशी तक्रार देखील त्यांनी केली आहे. सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली. मात्र यावर हरकत घेत ओबीसी समाजातील काही नेत्यांनी त्याला आव्हान दिलं आहे. त्यामुळे या अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतली आहे.
मराठा समाजाने जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली फार मोठ्या अपेक्षेने आंदोलन सुरू केलं होतं. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाची शक्ती आणि आकांक्षा या मोर्च्यावर स्थिरावल्या होत्या. हा मोर्चा अयशस्वी होणं हे आंदोलनाच्या नेत्यांना आणि शासनालाही परवडणारं नव्हतं. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत हा मोर्चा यशस्वी करणं ही सर्वांचीच गरज होती. आणि तो सफल होण्यासाठी फक्त शासनानेच नव्हे, तर आंदोलनाच्या नेत्यांनीही हातभार लावला असावा असं दिसून येतं. अधिसूचनेद्वारे अपेक्षेप्रमाणे आरक्षण हातात आलेलं नाही हे मनोज जरांगे यांच्या लक्षात आलं आहे. जे राज्य सरकारलाही शक्य नाही तो शब्द म्हणजे ‘सगेसोयरे’ प्रस्तावित नियमात टाकला गेला. आणि याच सगळ्या बाबी लक्षात आल्याने मनोज जरांगे पाटील हे पुन्हा बेमुदत उपोषणाला बसले आहेत. पुन्हा उपोषण सुरू झाल्याने अनेकांच्या मनात आरक्षणाविषयी शंका निर्माण झाल्या आहेत.