नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात गेली सहा दशकं ज्या घराण्याचं वर्चस्व राहिलं.. ज्यांना महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पिता-पुत्र मुख्यमंत्री होण्याचा पहिला मान ज्या पक्षामुळे मिळाला. ज्या पक्षाने राज्यातील मंत्रिमंडळात विविध विभागांचं कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाचीही जबाबदारी दिली.त्याच पक्षाला अशोकराव चव्हाण यांनी रामराम ठोकला.माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. पण अशोक चव्हाणांवर अशी वेळ का आली ? असं काय कारण आहे ज्यामुळे अशोकराव चव्हाणांना काँग्रेसचा हात सोडावा लागला जाणून घेऊयात…
मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी लोकसभेत २०१४ पूर्वीच्या अर्थव्यवस्थेसंदर्भातील एक श्वेतपत्रिका सादर केली होती. ज्यात युपीए सरकारच्या दहा वर्षांच्या काळातील आर्थिक गैरव्यवस्थापनाबाबत भाष्य करण्यात आलं. केंद्र सरकारने काढलेल्या या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख देखील करण्यात आला आहे. श्वेतपत्रिकेत या घोटाळ्याचा उल्लेख असल्यानेच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. आदर्श घोटाळ्याची अद्याप ट्रायल सुरु असल्याचे देखील या श्वेतपत्रिकेत म्हटलं आहे.