राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे स्वगृही म्हणजे भाजपमध्ये परतणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी दावा केला आहे की एकनाथ खडसे थेट दिल्लीतील भाजप नेतृत्त्वाच्या संपर्कात आहेत. भाजपमध्ये परतण्यासाठी ते फार जोर लावत आहेत.दिल्लीतून आणि राज्यातून या बातम्या माझ्यापर्यंत आल्या आहेत असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत या पुन्हा भाजपामध्ये परतण्याच्या चर्चांविषयी स्पष्टीकरण दिलं.त्यात ते म्हणाले की, “गेल्या काही दिवसांपासून मी भाजपात प्रवेश करणार अशा अफवा माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा या हेतून पसरवल्या जात आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे व राहणार. कार्यकर्त्यांनी, आणि नागरिकांनी अशा अफवांकडे दुर्लक्ष करावं.” असं आवाहन खडसे यांनी केलं होतं.खडसेंनी यावर स्पष्टीकरण दिलं असलं तरी गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील शीतयुद्ध सुरु असल्यानं अनेकदा दोघांमध्ये शाब्दीक चकमकी घडल्याच्या आपण पाहिल्या आहेत. परंतु, खरंच एकनाथ खडसे भाजपामध्ये परत जातील का ? जाणार असतील तर, त्याची काय कारणं असू शकतात… यासंदर्भात आपण या व्हिडिओमध्ये सविस्तराने जाणून घेऊयात…
ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसे आले त्या पक्षात फूट पडली. मोठ्या संख्येने आमदार अजित पवार यांच्याबरोबर गेले आणि भाजपाबरोबरच्या सत्तेत सहभागी झालेत. या फुटीनंतर शरद पवार यांच्या गटाच्या अनेक कार्यक्रमांत एकनाथ खडसेंचा सहभाग फारसा दिसून येत नाही. आता एक गोष्ट आहे की, रोहिणी खडसे यांना शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळं गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील विळ्याभोपळ्याचं सख्य पाहता महाजन यांनी खडसेंच्या भाजपा प्रवेशाबाबत केलेले विधान किती खरं आणि किती खोटं याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.