गेली अनेक दशके काँग्रेस पक्षात कार्यरत असलेले, ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात जाहीर प्रवेश केला.. यामुळं मराठवाड्यात काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. दरम्यान अशोक चव्हाण यांनी कमळ हाती घेतल्यानंतर आता भाजप शरद पवारांच्या गटातील बड्या नेत्याला गळाला लावण्याच्या तयारीत आहे. पश्चिम महाराष्ट्रात ताकद राखून असलेल्या नेत्याला भाजपमध्ये आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
भाजपनं लोकसभा निवडणुकीत मिशन ४५ हे उद्दिष्ट ठेवलं आहे. अशात जी वेगवेगळी सर्वेक्षणं समोर येत आहेत त्यातून शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी यांना सोबत घेऊनही राज्यात एनडीएला २५ पेक्षा अधिक जागा मिळणार नसल्याचे अंदाज व्यक्त होत आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आणखी नेते फोडायची तयारी भाजपकडून सुरू आहे. स्वत:च्या जिल्ह्यात आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये वर्चस्व असलेल्या नेत्यांना पक्षात सामील करुन घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर शरद पवारांना साथ दिलेला नेता अजित पवारांसोबत जाणार, त्यांना मंत्रिमंडळात महत्त्वाचं खातं देण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण या नेत्यानं त्याबद्दलच्या चर्चा फेटाळल्या. पवारांसोबत असलेल्या नेत्याला पक्षात घेतल्यास सांगली, सातारा, कोल्हापूर अशा तीन जिल्ह्यांमध्ये भाजपची ताकद वाढू शकेल. राज्य भाजपमधील एका बड्या नेत्यानं आणि दिल्लीतील एका नेत्यानं या नेत्यासोबत चर्चा केल्याचं समजतं.
सहकार चळवळ, साखर कारखाने आणि संस्था यांच्यामुळे पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या काही वर्षांत भाजपनं या भागात शिरकाव केला असला तरीही अद्यापही त्यांना या भागात पूर्ण पकड मिळवता आलेली नाही. त्यामुळेच शरद पवारांचे निष्ठावंत असलेल्या नेत्याला गळाला लावण्याची तयारी भाजपनं केली आहे. तशा हालचाली सुरू आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस अभेद्य असताना या नेत्याचे अजित पवारांशी फारसे जमत नव्हते. शरद पवारांचे विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. अजित पवारांच्या बंडानंतरही ते पवारांच्या बाजूनं भक्कमपणे उभे राहिले.