मुंबई | पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शऱद पवार गटातील विश्वासू नेत्याला पक्षात आणण्याच्या भाजपमध्ये जोरदार हालचाली सुरु आहेत अशा आशयाच्या बातम्या सकाळपासून माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात दाखवल्या जात आहेत. त्यानंतर राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आलं. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण देत या बातम्या केवळ अफवाच आहेत असं म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला धक्के देण्याची रणनिती आखल्याचं वृत्त समोर आले. लोकसभेला 42 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या असतील, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्वाचे आणि ताकदीचे नेते आणले पाहिजेत तरच हे शक्य होईल, असी या रणनीतीमागील भूमिका आहे असंही म्हटलं जात आहे.
नुकताच झालेल्या अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपची मराठवाड्यातील ताकद वाढली. नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन मतदारसंघाला त्याचा फायदा होईल. मराठवाड्यानंतर भाजपनं पश्चिम महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याची बातमी सकाळी धडकली. या बातमीचं जयंत पाटील यांच्याकडून खंडन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकसंध आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ विरोधकांबाबत संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे. त्याशिवाय दोन-तीन दिवसात जागा वाटपाचा अंतिम निर्णय पूर्ण होणार असल्याचं सुतोवाच जयंत पाटलांनी केलं आहे.