भाजपने मुंबईत अधिकाधिक जागा आपल्याकडे खेचून घेण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे.शिवसेनेच्या अनेक जागांवर आपलाच दावा ठोकला आहे.मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघांपैकी भाजप चार तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी केवळ दोन जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबईसह भाजप दक्षिण मुंबईची जागा लढवण्यावर ठाम आहे. तर शिवसेनेला उत्तर पश्चिम मुंबई, आणि दक्षिण मध्य मुंबईची जागा सोडण्याची शक्यता आहे. भाजप ज्या चार जागा लढण्यावर ठाम आहे.त्यातील दक्षिण मुंबई हा राज्यातल्या ४८ लोकसभा मतदार संघातील एक हायप्रोफाइल लोकसभा मतदारसंघ आहे.या मतदारसंघातून कोण कोणा विरोधात रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित झाल्याचे संकेत मिळाले आहेत.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत आणि भाजपचे राहुल नार्वेकर यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे…
मराठी, गुजराती आणि मुस्लिम मतदारांची मोठी संख्या असलेल्या या मतदारसंघात सध्या अरविंद सावंत हे खासदार आहेत. सावंत हे उत्तम लोकसंपर्क असलेले लो-प्रोफाइल कामगार नेते आहेत. मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे. मागील दहा वर्षांपासून खासदार असलेल्या सावंत यांचा मतदारसंघात जम बसला आहे. त्यांना टक्कर द्यायची असेल तर तितकाच तगडा आणि कोकणी उमेदवार दिला पाहिजे असं भाजपला वाटतंय. याचमुळं उच्चशिक्षित, तरुण आणि कोकणी चेहरा हे समीकरण बघता राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली… दक्षिण मुंबई मतदारसंघात मुख्यतः मराठी, गुजराती, मारवाडी आणि जैन समाजाचे मतदार मोठ्या प्रमाणात आहे. लालबाग, काळाचौकी, शिवडी आणि परळ भागांत मराठी मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. हा शिवसेनेचा पारंपरीक मतदार आहे. लालबाग, परळ म्हणजे, एकंदरीत संपूर्ण गिरणगाव गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेना आणि विशेषतः ठाकरेंशी एकनिष्ठ आहे. त्यामुळं या पट्ट्यात भाजपाला कितपत पसंती मिळेल हा प्रश्न आहे. अशातच इथे मनसेनं उमेदवार दिला, तर मात्र समीकरण काहीसं बदलू शकतं. लोकसभेच्या उमेदवारी बाबत बोलताना पक्ष जी संधी देईन ती मी पार पाडीन असं खुद्द राहुल नार्वेकर म्हणालेत. लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळणार हे अधिकृतरित्या उमेदवार जाहीर झाल्यावर कळेल.