मुंबई | लोकसभेच्या निवडणुका जाहीर होऊन बरेच दिवस लोटलेत मात्र तरीही महाविकास आघाडीचा आणि महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. पक्षांतर्गतील कुरघोडी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. मुंबईमध्येच काही निर्णय होत नसल्याने दिल्लीचा अंतिम फैसलाही अडकून आहे. उमेदवारीसाठी नेतेमंडळी पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यात माढा लोकसभेसाठी भाजपकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवारीला अजित पवार गटाकडून जोरदार विरोध होत आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांची समजूत काढण्यासाठी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक होऊनही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विरोध सुरूच आहे. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे उभा असल्या तरी शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे इथून निवडणूक लढवण्यावर ठाम आहे कारण इथे त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुनेत्रा पवार यांना विरोध करून अजित पवारांना संकटात टाकायचं आहे कारण शिवतारे आणि अजित पवार यांच्यात सुप्तसंघर्ष सुरु आहे तर भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनीही अजित पवार यांच्याविषयीची नाराजी बोलून दाखवली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटलांची भेटही घेतली होती.
तर चंद्रपूर लोकसभेमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढलीय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार की आमदार प्रतिभा धानोरकर याबाबतचा ‘सस्पेन्स’ कायम आहे. दक्षिण-मध्य मुंबईत शिवसेनेतून दोन टर्म खासदार राहिलेले राहुल शेवाळे उमेदवार असतील आणि त्यांना टक्कर देण्यासाठी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना संधी दिली जाऊ शकते. या जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून राज्यसभेचे खासदार अनिल देसाई यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु करण्यात आल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत.
महायुतीत ‘या’ जागेवरून मतभेद
नाशिकची जागा शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीलाही हवीय…रामटेक, कोल्हापूर आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गवरून भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे…धाराशिव, गडचिरोली, सातारा या तीन जागांवर भाजप अन् राष्ट्रवादीनेही दावा केला आहे.
महाविकास आघाडीत ‘या’ जागेंवरून तिढा
रामटेक, दक्षिण-मध्य मुंबई, सांगली हे काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हवेत…भिवंडीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दावा केला आहे. जालनाच्या जागेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबरचं काँग्रेसही आग्रही असल्याच दिसून येत आहे. मुंबईत काँग्रेसला किमान दोन जागा हव्या आहेत.
‘या’ जागांमुळे भाजपची डोकेदुखी वाढली
अमरावतीत विद्यमान खासदार नवनीत राणांना उमेदवारी देण्याची चर्चा जरी असली तरी त्यांना स्थानिक बहुतेक सर्व भाजप नेत्यांचा विरोध आहे. माढामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीस राष्ट्रवादी नेते रामराजे निंबाळकर आणि भाजपचे विजयसिंह मोहिते पाटील यांचा विरोध आहे. सोलापूरचा उमेदवार ठरवण्यात स्थानिक नेत्यांमध्येचं एकी नाही. सातारामध्ये उदयनराजे यांना उमेदवारी देण्याबाबत मतदारसंघातील काही भाजप नेत्यांसोबतच राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षातील नेत्यांची नाराजी आहे. तर यवतमाळ-वाशिममध्ये शिवसेनेच्या भावना गवळी यांना विरोध करण्यासाठी भाजपचे दोन्ही जिल्ह्यातील नेते उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे जोर लावताना दिसत आहे. गवळी यांना तिकीट दिले तर उद्धव ठाकरे यांचा उमेदवार लोकसभेत जागा बळकावणार याचा अंदाज भाजपला आला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल. केवळ हीच जागा नाही तर रामटेकची जागाही आपल्याकडे घ्या असा दबाव स्थानिक भाजप नेत्यांनी फडणवीसांवर आणला आहे.
वंचित बहुजन आघडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर आता महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता अगदीच कमी आहे. अजूनही आंबेडकर यांच्याशी अन्य तिन्ही पक्षांचे नेते चर्चा करत आहेत. आंबेडकर रोज नवनव्या मागण्या करत आहेत त्यामुळे त्यांच्याशी चर्चा सफल होण्यात अडचणी येत आहेत असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितल आहे त्यामुळे ॲड. प्रकाश आंबेडकर हे महायुतीमध्ये सामील होणार का? हेदेखील कुणी ठामपणे सांगू शकत नाही.
दरम्यान, मविआ आणि महायुतीतील जागावाटपाचा तिढा कधी सुटणार आणि कोणाला उमेदवारी मिळणार? हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल.