पुणे लोकसभा निवडणूक २०२४
पुणे लोकसभा मतदार संघात चुरशीची लढत होण्याची चिन्हं आहेत. महायुतीमधून भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता महाविकास आघाडीमधून काँग्रेसनं कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. मोहोळ विरुद्ध धंगेकर अशी लढत होण्याची चिन्ह असताना आता मनसेला जय महाराष्ट्र केलेल्या वसंत मोरे यांनी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केलीय. त्यामुळं पुण्यात तिरंगी लढत होणार असं दिसतंय. पुण्यात जर ही तिरंगी लढत झाली तर, कुणाची ताकद कशी असेल आणि कुणासमोर कोणती आव्हानं असतील यासंदर्भात आपण या व्हिडिओ मधून जाणून घेऊ…
महापौर म्हणून कोरोना काळात केलेल्या कामामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले मुरलीधर मोहोळ यांना भाजपने ताकद देत लोकसभा निवडणुकीचा चेहरा बनवलं.संघाच्या आणि भाजपाच्या मुशीत तयार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांची वैयक्तिक ताकदीपेक्षा पक्षाच्या ताकदीवरच भिस्त असणार आहे.पुण्यात आरएसएसचं मोठं नेटवर्क आहे. त्याचा फायदा मोहोळ यांना होईल. पुणे महापालिकेत 98 नगरसेवक आणि लोकसभेत समाविष्ट असलेल्या सहापैकी 4 विधानसभेत भाजपाचे आमदार असलेल्या भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांची देखील मदत मिळेल. वरवर सर्व आलबेल दिसत असलं तरी भाजपमध्ये सर्वकाही ठिक नाही. लोकसभेला प्रबळ दावेदार राहिलेल्या माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची समजूत कशी काढायची हा मोठा प्रश्न भाजपाच्या वरिष्ठांसमोर आहे.
पुणे लोकसभेच्या रिंगणात असलेले दुसरे काँग्रेसचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर हे मागील तीस वर्षांपासून राजकारणात आहेत. शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९९७ मध्ये ते पहिल्यांदा नगरसेवक झाले. २००२ मध्ये दुसऱ्यांदा ते नगरसेवक झाले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. २००७ आणि २०१२ मध्ये ते मनसेच्या तिकिटावर नगरसेवक झाले. २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष म्हणून निवडणूक लढवून यश मिळवलं. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी प्रभागरचना बदलल्यानंतरही धंगेकर यांनी निवडणूक जिंकली आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडून लढलेल्या धंगेकर व भाजपाचे गिरीश बापट यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. पराभव झालेल्या धंगेकरांना ४६ हजार ८२० मतं मिळाली होती… २०१४ मध्येही मनसेकडून ते विधानसभा लढले. त्यावेळी त्यांना २५ हजार ९९८ मतं मिळाली होती… कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झाल्यानंतर कसबापेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी धंगेकरांना तिकिट मिळालं आणि हीच त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला.
मनसेला जय महाराष्ट्र केलेले ज्येष्ठ नगरसेवक वसंत मोरे यांनी सुरुवातीला शरद पवार, संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांची भेट घेतली. पुणे लोकसभा लढवण्याची इच्छा त्यांनी त्यांच्याकडे बोलून दाखवली. परंतु, काँग्रेसनं धंगेकर यांना उमेदवारी दिल्यानं आता अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय वसंत मोरे यांनी जाहीर केला आहे. त्यामुळं पुण्यात तिरंगी लढत होईल.