सांगली | लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर होत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनही उमेदवारी यादी जाहीर झाली असून १७ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये सांगली लोकसभा मतदार संघातून डबल महाराष्ट्र केसरी झालेल्या चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली त्यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आणि काँग्रेसमध्ये खटके उडू लागलेत. सांगलीच्या या उमेदवारी नाट्यामुळं आघाडीत मिठाचा खडा पडतोय की काय अशी स्थिती आहे. याशिवाय शरद पवारांनी देखील परस्पर उमेदवारी यादी जाहीर करण्यावरून नाराजी व्यक्त केलीय. आघाडीत नेमकं काय घडलं की बिघाडी होऊ लागलीय याच विषयी जाणून घेण्यासाठी सदर व्हिडिओ पाहा…
सांगली लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार संघ मानला जातो. परंतु, गेल्या सलग दोन लोकसभा निवडणुकीत इथं प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आला आहे. यावेळीही विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनाच भाजपानं उमेदवारी दिली आहे आणि त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काँग्रेसला विचारात न घेता पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळं काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी नाराजी प्रकट केली आहे.
दिग्गज नेत्यांची मोठी परंपरा असलेला सांगली जिल्हा गेल्या दशकापर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असला तरी २०१४ मध्ये मोदी लाटेत हा बालेकिल्ला ढासळला आणि इथून भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील हे निवडून आले ते दोन टर्म खासदार राहिले आहेत आणि यंदाही त्यांना हॅट्रिक मारण्यासाठी संधी मिळाली आहे.
काँग्रेसकडून ही जागा लढवण्यासाठी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत तर, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांच्यासह मविआचे अनेक नेते देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्याच्या विषयावर नाराज असल्याची माहिती आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना ठाकरेंनी असा परस्पर निर्णय घेणं चुकीचं आहे. जेव्हा या जागेवर अजून चर्चा सुरु आहे तेव्हा आघाडी धर्म पाळायला हवा होता अजूनही वेळ गेली नाही बसून चर्चा करून तोडगा काढू असही त्यांनी म्हटलं आहे.
आता सांगली लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत निर्माण झालेला हा तिढा सुटणार की आघाडीत बिघाडी होणार हे लवकरच कळेल. 2019 च्या निवडणुकीच्या आधी प्रतीक पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला. निवडणुकीच्या अगदी दोन महिने आधी काँग्रेसमधून लढायला कोणी नव्हते अशी परीस्थिती निर्माण झाली होती कदम आणि पाटील घराण्याबाहेरच्या उमेदवाराचा विचारही काँग्रेसने केला नव्हता. शेवटी आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली. यावेळी त्यांनी जिल्ह्यात चांगलीच ताकद असणाऱ्या काँग्रेसमधल्याच विशाल पाटलांना आयात करत त्यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत विशाल पाटील, भाजपकडून संजयकाका पाटील यांच्यात थेट लढत होईल असं वाटत असताना गोपीचंद पडळकर यांच्या एन्ट्रीने आणखी एक twist पाहायला मिळाला होता. पडळकर सुरुवातीला काँग्रेस- स्वाभिमानीकडून रिंगणात उतरणार होते. मात्र, ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली आणि जिल्ह्यात प्रचाराचा धुरळा उडवला. या निवडणुकीत पडळकरांना तिसर्या क्रमांकाची मतं मिळाली आणि याचा फटका आघाडीच्या उमेदवाराला बसला…परिणामी भाजपने हा अटीतटीचा सामना संजयकाका पाटलांच्या रूपानं जिंकला.
आता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस दावा सांगत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील या मतदार संघासाठी आग्रही आहे. त्यांनी आपला उमेदवारही दिला परंतु, त्यांची इथं ताकद किती आहे? पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर कोल्हापूर, हातकणंगलेमध्ये शिवसेना तुलनेने अधिक प्रभावी आहे मात्र इथले दोन्ही खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आहेत शिवाय आघाडीमधील वाटाघाटीत कोल्हापूर काँग्रेसकडे गेल्याने, पक्षातील फुटीनंतर पश्चिम महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हक्काच्या मतदारसंघाची आवश्यकता आहे आणि म्हणूनच ठाकरे या मतदारसंघासाठी आग्रही असल्याचं बोललं जातंय. आणखी एक कारण म्हणजे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना भाजपामधून होत असलेला विरोध हा ठाकरेंना फायद्याचा ठरू शकतो आणि त्यामुळेच कोल्हापूरची जागा सोडल्यानंतर सांगलीच्या जागेवर त्यांनी दावा सांगितला आहे.
एकीकडे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये सांगलीसाठी रस्सीखेच सुरू असतानाच आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मात्र मौन बाळगलं आहे. त्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगलीतील प्रमुख नेते जयंत पाटील आणि वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील इतिहास इथं कारणीभूत ठरतो. त्यामुळे महायुतीचा सामना करण्यासाठी महाविकास आघाडी मजबूत करून एकास एक उमेदवार देण्याचे प्रयत्न केले जात असताना आघाडीत सांगली च्या जागेवरून अद्यापही सहमती होऊ शकलेली नाही. तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू असतानाच शिवसेनेने आपली पहिली यादी जाहीर केल्यामुळे आता महाविकास आघाडीतील नाराजी संपणार का? हा प्रश्न आहे कारण, याच मुद्द्यावरून शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.