वर्धा | जातीय ध्रुवीकरणाची किनार असलेला वर्धा लोकसभा मतदारसंघ हा स्थापनेपासूनच काँग्रेस लढवत आला आहे. कधीकाळी काँग्रेसचा गड म्हणून वर्धा लोकसभा मतदार संघ ओळखला जायचा पण अलीकडच्या काळात वर्ध्याने भाजपला साथ देण सुरू केलं आहे. या मतदार संघातून महायुतीतून भाजपचा उमेदवार तर महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार मैदानात आहे. वर्ध्यात जातीय समीकरण आतापर्यंत महत्वाची ठरली आहे त्यामुळे इथली तेली विरुद्ध कुणबी अशी पारंपरिक लढत होणार असल्याचं बोललं जात आहे..असं झाल्यास ही जातीय समीकरणं कोणाला फायद्याची ठरणार याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी सदर व्हिडीओ पाहा…
विदर्भातील वर्धा लोकसभा मतदारसंघ हा महात्मा गांधींची कर्मभूमी म्हणून ओळखला जाणारा आणि त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेला मतदारसंघ म्हणून परिचित आहे. मतदानाच्या चौथ्या टप्प्यामध्ये म्हणजे 13 मे रोजी वर्ध्यात पुढचा खासदार कोण असेल यासाठी मतदार मतदान करणार आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आलेल्या या मतदार संघातून माजी आमदार अमर काळे तर भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार रामदास तडस यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं आहे. भाजपकडून तडस यांना खासदारकीची हॅट्रिक करण्याची संधी पक्षाकडून देण्यात आलीय तर पवारांनी काँग्रेसमधील अमर काळे यांना आपल्या पक्षात घेत त्यांना उमेदवारी जाहीर करून नवा डाव टाकलाय. वर्धा लोकसभेत येणाऱ्या सहापैकी चार विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत तर उर्वरित दोन मतदारसंघात काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्षाचा प्रत्येकी एक आमदार आहे.
या लोकसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची राजकीय कारकीर्द
विदर्भात पैलवान म्हणून प्रसिद्धी मिळवल्यानंतर विरोधकांना धोबीपछाड करण्याची परंपरा रामदास तडस यांनी राजकारणाच्या आखाड्यातही कायम ठेवली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, नगर परिषदेपासून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे काँग्रेसमध्ये प्रवेश करत त्यांनी विधान परिषदेच्या माध्यमातून मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना या मतदार संघातून खासदारकीची संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधीचं सोनं करत विजय मिळवला. पुन्हा 2019 मध्ये तडस यांच्या माध्यमातून भाजपचाच झेंडा इथं फडकला त्यामुळं आता यंदाच्या निवडणुकीत देखील भाजपनं पुन्हा एकदा तडस यांनाच संधी दिलीय तर प्रतिस्पर्धी असलेले अमर काळे हे माजी आमदार डॉ. शरद काळे यांचे पूत्र आहे त्यामुळे राजकारणाचं बाळकडू त्यांना घराण्यातूनच मिळालं. या जागेसाठी यांचं नाव सुरुवातीला काँग्रेसकडून चर्चेत होतं मात्र शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. अमर काळे हे २०१४ साली कॉंग्रेस पक्षातून वर्ध्यातील आर्वी विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. तर खासदारकीची हॅट्रिक पूर्ण करण्यासाठी रिंगणात उतरलेले भाजपचे रामदास तडस यांना प्रथमच कडवं आव्हान असणार आहे.
वर्धा लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने तेली विरुद्ध कुणबी समाज अशी पारंपारिक लढत होत आली आहे. तेली समाजातील तडस यांनी २०१४ सालच्या निवडणुकीमध्ये माजी खासदार दत्ता मेघे यांचे पूत्र सागर मेघे आणि २०१९ च्या निवडणुकीत माजी खासदार प्रभा राव यांच्या कन्या चारूलता टोकस या कुणबी समाजातील उमेदवारांचा पराभव केला होता.
आता २०२४ मध्येही अमर काळे यांच्यासोबत तडस यांची लढत होत आहे. तेली समाजातील राज्यातील एकमेव उमेदवारी म्हणून भाजपच्या पहिल्याच यादीत तडस यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यांनतर अर्धी लढाई जिंकल्याचं समाधान तडस समर्थकांमध्ये उमटलं होतं कारण विरोधात लढणार कोण हे समजलं नव्हतं. शिवाय काँग्रेसमध्ये लढण्यासाठी फारसं कोणी उत्सुक नव्हतं त्यांनतर महाविकास आघाडीकडून जिल्ह्यातील इतर नेत्यांना डावलून काळे यांना पसंती देण्यात आली. आधल्या दिवशी काळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आणि दुसऱ्या दिवशी त्यांची उमेदवारी जाहीर झाली.
भाजपने गेल्या वर्षभरापासून निवडणुकीची तयारी सुरू केली होती. उमेदवार कोणीही असो कमळाला मतदान होईल अशी बांधणी भाजपकडून करण्यात येत आहे त्या तुलनेत अमर काळे यांची राष्ट्रवादी तसेच मित्रपक्षांकडे संघटना बांधणी इतकी पक्की आहे असं ठामपणे सांगता येणार नाही. या टप्प्यात मोदी हवे की नको असं निवडणुकीचं ध्रुवीकरण करण्यावर भाजपने भर दिलाय तर विविध पक्ष व संघटनांची मोट बांधून इंडिया आघाडी काळेंच्या मदतीला आहे शिवाय मोदी नको या एकाच पैलूवर महाविकास आघाडीतले नेते एकत्र आले आहे. त्यामुळे मोदींच्या नेतृत्वातील मागील १० वर्षांच्या कार्यकाळात केलेलं काम यावर महायुती व भावनिक हिंदोळ्यावरील महाविकास आघाडी अशी इथ लढत होईल यात शंका नाही.
आता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत या दुहेरी लढतीत मतांचं विभाजन हे जातीय पैलूवर होईल का? शिवाय प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात तडस यांच्या सुनेने केलेल्या आरोपांमुळे तडस यांना बचावात्मक भूमिका घ्यावी लागली आहे. त्याचा त्यांना फटका बसेल का? कारण तडस यांच्या स्नुषा पूजा तडस यादेखील इथून अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहेत. आणखी एक मुद्दा इथ उपस्थित होतो तो म्हणजे शरद पवारांनी विदर्भातील पक्षाचं अस्तित्व कायम राहावं म्हणून काँग्रेसकडून हा मतदारसंघ मागून घेत खेळलेल्या डावाचा भविष्यातील राजकारणात परिणाम होईल का? हे आपल्याला पाहावं लागेल.