दिंडोरी | सध्या महाविकास आघाडीत दिंडोरीच्या जागेवरून बिघाडी झाल्याचं दिसून येत आहे कारण दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष निवडणूक लढण्यावर ठाम आहे. माकपचे जे. पी. गावित यांनी या मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला परंतु यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. दिंडोरीत मविआच्या फुटीवर शिक्कामोर्तब झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या मतदार संघात महाविकास आघाडीसाठी माकप किती महत्वाचं होतं? आणि आता माकपच्या या निर्णयाने काय फरक पडू शकतो याचविषयी जाणून घेण्यासाठी सदर व्हिडिओ पाहा…
सुरुवातीला महाविकास आघाडीत दिंडोरीची जागा माकपला सोडावी अशी मागणी माकपचे माजी आमदार जे.पी.गावित यांनी केली होती. मात्र ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आली. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे मात्र यामुळे गावित नाराज झाले. काही दिवसांपूर्वी त्यांनी दिंडोरीत जाहीर सभा घेत महाविकास आघाडीने दिंडोरीचा उमेदवार न बदलल्यास माकप स्वतंत्र लढणार असा इशाराही दिला होता. पण मविआने यावर विचार न करता आपला उमेदवार कायम ठेवला आणि अखेर माकपचे माजी आमदार जे. पी. गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामुळे आता महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. शिवाय दिंडोरीमध्ये मविआमधील फुटीवरही शिक्कामोर्तब झालं आहे. एकीकडे नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये तिढा कायम आहे. तर दुसरीकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात माकपच्या एन्ट्रीने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. महाविकास आघाडीत पहिल्या दिवसापासून माकपने मित्रपक्षाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका घेतली होती. परंतु, गेल्या आठवड्यात जे पी गावित यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत निवडणूक लढवण्याची घोषणा केली आणि तेव्हाच महाविकास आघाडीच्या फुटीची पहिली ठिणगी पडली. दिंडोरीतला हा डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट दिंडोरी गाठत गावितांशी चर्चा देखील केली परंतु त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. त्यावेळी विधानसभेच्या मदतीचा प्रस्ताव जयंत पाटील यांनी गावितांसमोर ठेवला होता पण आमचा पक्ष एकदा घेतलेला निर्णय पुन्हा मागे घेत नाही असे सांगत त्यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला होता.
माकपच्या निवडणुकीतील एन्ट्रीमुळे काय फरक पडेल?
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण हे विजयी झाले होते त्यांना 5,42,784 मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात उभा असलेल्या राष्ट्रवादीच्या भारती पवार यांना 2,95,165 मते मिळाली होती. या लढतीत तिसऱ्या स्थानी असलेले माकपचे उमेदवार हेमंत वाघेरे यांना 72,599 मत मिळाली होती. 2,47,619 मतांच्या फरकाने चव्हाण यांनी बाजी मारली होती.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या भारती पवार या 1,98,779 मतांनी जिंकून आल्या होत्या. त्यांना या निवडणुकीत 5,67,470 मते मिळाली होती तर त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून उभा असलेले धनराज महाले यांना 3,68,691 मते मिळाली होती. इथही माकप तिसऱ्या स्थानावरच राहिला. माकपचे उमेदवार जीवा पांडू गावित यांना 1,09,570 मते मिळाली होती.
या मतदार संघात माकपचं वर्चस्व आहे त्यामुळे महाविकास आघाडीसाठी माकप या पक्षाला सोबत घेण महत्वाचं होत. आता महाविकास आघाडी आणि माकप हे स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत त्यामुळे याचा थेट फटका हा मविआच्या उमेदवाराला होण्याची शक्यता अधिक आहे माकप या पक्षातून लढणारे जे. पी. गावीत यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शेतकरी हक्कांचे वकील म्हणून केली आणि किसान सभेचे ते सदस्य झाले. त्यानंतर १९७८ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर ते आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले. पुढे १९८०, १९८५, १९९० १९९९, २००४ आणि २०१४ ला ते याच पक्षातून आमदार म्हणून विधानसभेवर गेले. २०१४ मध्ये त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे तात्पुरते अध्यक्षपदही भूषवलं आहे.
आताची स्थिती पाहिली तर, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शेतकऱ्यांचा प्रश्न हा प्रमुख राजकीय मुद्दा बनला आहे. या प्रश्नावर महाविकास आघाडीने जोरदार आंदोलन केले होत…त्यात माकपचा देखील सहभाग होता…शेतकरी भारतीय जनता पक्षावर नाराज आहे अशीही चर्चा आहे त्यामुळे या मतदारसंघात सध्या महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे त्यात माकपने बंडखोरी केल्याने भारतीय जनता पक्षाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, आता दिंडोरीत महायुती, महाविकास आघाडी, माकप व वंचित अशी चौरंगी लढत रंगणार आहे. महायुतीतून भाजपने विद्यमान खासदार डॉ. भारती पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून भास्कर भगरे यांना मैदानात उतरवलं आहे. माकपकडून जे पी गावित हे उमेदवार असतील तर वंचित बहुजन आघाडीकडून मालती थविल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता या चौरंगी लढतीत फायदा कुणाला आणि तोटा कुणाला होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे…