नाशिक लोकसभा
राज्यात बहुचर्चित अशा नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीत कोणाला उमेदवारी मिळणार याचीच चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होती. त्यातच छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळं ही जागा नेमकी कोणाकडे जाणार यासाठी तर्क लावले जात असतानाच आता या मतदारसंघानं पुन्हा एकदा संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलं आहे.नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी माघार घेतली असली तरीही त्यांचे विश्वासू सहकारी दिलीप खैरे यांनी अर्ज घेतला आहे.त्यामुळं छगन भुजबळ माघार घेऊनही नवी खेळी खेळतायत का ? हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात.
नाशिकचा तिढा अजूनही सुटेला नसून अनेक इच्छुकांचा जीव भांड्यात अडकला आहे. खरंतर नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा विद्यमान खासदार आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी मोठी ताकद पणाला लावली आहे.गोडसेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आतापर्यंत तब्बल दहा ते बारा वेळा भेटी घेतल्या आहेत. त्यामुळे गोडसे हे दावा सोडण्यास तयार नाही. खासदार हेमंत गोडसेंनी मतदारसंघात प्रचारही सुरू केला असून अनेक महिन्यांपासून ते प्रचार करत आहे. स्वतः मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांना प्रचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिंदे यांनी नाशिकची जागा शिवसेना लढवणार असल्याचं म्हटलं आहे.गोडसे यांच्यासोबत शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचंही नाव चर्चेत आहे.
भाजपकडून देखील नाशिक लोकसभेवर दावा सांगितला जात आहे. भाजपकडून स्वामी शांतिगिरी महाराज, एडवोकेट राहुल ढिकले, दिनकर पाटील इच्छुक आहेत. यासह अजित पवारांची राष्ट्रवादी नाशिक लोकसभेसाठी आग्रही आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत.छगन भुजबळ यांना मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात विरोध होऊ शकतो असं भाजपला वाटतंय, त्यामुळे भुजबळांनी माघार घेतली असली तरी त्यांच्याच गोटातील उमेदवार दिला जाणार ही बाब इथं समोर येत आहे. एका बाजूला शिंदे गटातून हेमंत गोडसे, अजय बोरस्ते तर भाजपकडून स्वामी शांतिगिरी महाराज इथल्या जागेसाठी बाशिंग बांधून बसलेले असतानाच दुसरीकडे दिलीप खैरे यांनी अर्ज घेतल्यानं भुजबळांच्या राजकीय खेळीची चर्चा सध्या जोरात सुरु आहे.