नाशिक
नाशिक लोकसभा मतदार संघातून महायुतीचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे मैदानात आहेत.पण इथं दुरंगी लढत होणार नसून तिरंगी सामना रंगणार आहे. कारण शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. ते देखील नाशिकमधून खासदारकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
दरम्यान, स्वामी शांतिगिरी महाराज यांनी भुजबळ फार्म इथं मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतली. या पूर्वी महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार, डॉ सुभाष भामरे, हेमंत गोडसे यांनी भुजबळ यांची भेट घेतली होती. मात्र अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.नाशिक लोकसभा मतदारसंघात शांतीगिरी महाराज हे महायुतीकडून उमेदवारी मिळण्यासाठी आग्रही होते. मात्र महायुतीकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर महायुतीनं शांतीगिरी महाराजांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र शांतीगिरी महाराज हे निवडणूक लढवण्यावर ठाम राहिलेत. अशात स्वामी शांतीगिरी महाराज यांनी भुजबळ फार्मवर मंत्री छगन भुजबळांची भेट घेत बंद दाराआड जवळपास तासभर चर्चा केली. अपक्ष उमेदवार असलेल्या शांतिगिरी महाराजांनी महायुतीच्या नेत्याची भेट घेतल्यानं हा विषय चर्चेचा ठरला आहे.नाशिकचे भाजपा पदाधिकारी दिनकर पाटील हे देखील नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी जोरदार तयारीला सुरुवातही केली होती. मात्र हेमंत गोडसेंना तिकीट मिळाल्यानं दिनकर पाटील हे सध्या नाराज आहेत. अशातच प्रचारादरम्यान स्वामी शांतीगिरी महाराज यांनी दिनकर पाटील यांची देखील भेट घेतली. विशेष म्हणजे दोघांमध्ये अर्धा तास बंद दाराआड चर्चा देखील झाली. या भेटीनंतर महायुती गटात चर्चेला उधाण आलं आहे.
छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे ते चर्चेत आहेत. त्यामुळे छगन भुजबळ यांचे समर्थक नाशिक मतदार संघातून महायुतीची उमेदवारी न मिळाल्यानं नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर भुजबळ समर्थक कार्यकर्ते हे या निवडणुकीत कोणाला मदत करतात, हा उत्सुकतेचा विषय आहे. अशात महायुतीचे उमेदवार खासदार गोडसे यांनी देखील दोन दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांची भेट घेतली होती. मंत्री भुजबळ यांनी या बैठकीत हेमंत गोडसे यांना महायुतीचे नेते म्हणून सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं . मात्र असं असलं तरी या निवडणुकीत छगन भुजबळ समर्थक कुणाला मदत करतात, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.