देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले आहेत.पहिल्या टप्प्यात ६३.७० टक्के, दुसऱ्या टप्प्यात ५३. ७१ टक्के मतदान झालं, तिसऱ्या टप्प्यात ६१.४० टक्के मतदान झालं आणि चौथ्या टप्प्यात सरासरी ६२ टक्के मतदान झाले आहे. चौथ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदार संघात मतदान पार पडलं. यामध्ये मराठवाड्यातील बीड आणि जालना या मतदारसंघांचा समावेश होता. या दोन मतदारसंघात गतवेळच्या तुलनेत अधिक मतदान झाल्याची माहिती पुढे आली आहे.
बीड आणि जालना या दोन मतदारसंघांमध्ये टक्केवारी वाढल्याचं दिसून आलं. बीडमध्ये ७० टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली तर जालन्यात ६८.३० टक्के मतदानाची नोंद झाली आहे..या वाढत्या टक्केवारीला जातीय संघर्षाची किनार असल्याची चर्चा आहे.मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यातील आहेत. अंतरवली सराटी या गावचे आहेत. इथूनच त्यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. मराठा आरक्षणाचा प्रभाव फक्त जालनाच नाही तर बीडमध्ये ही मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. त्यामुळे बीडमध्ये याचे पडसाद उमटल्याचे चित्र पाहायला मिळालं. निवडणूक प्रचारादरम्यान उमेदवारांना नजतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं.
बीडमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. गेल्या वेळेपेक्षा यात ४ टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची किनार असल्याचं बोललं जातं. त्यामुळे दोन्ही समाजांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचं चित्र आहे. ही वाढीव टक्केवारी कोणाला फायदेशीर ठरणार, याची आकडेमोड दोन्ही उमेदवारांकडून करण्यात येत आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारसभेत शरद पवार यांनी मनोज जरांगे यांचं नाव घेतलं होतं. त्यातूनही जो जायचा तो संदेश गेला. पंकजा मुंडे यांच्या प्रचारसभेत धनंजय मुंडे यांनीही ‘या जातीय संघर्षाला कंटाळलो आहोत’ असं विधान केलं. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं केंद्रबिंदू असलेल्या जालना जिल्ह्यातही गत वेळच्या तुलनेत चार टक्के मतदान वाढलं आहे. गेल्या वेळी ६४ टक्के मतदान झालं होतं. यंदा ६८ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं. या दोन जिल्ह्यांच्या तुलनेत छत्रपती संभाजीनगरमध्ये फारसा फरक पडलेला नाही.