उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याच्या चर्चाना उधाण आलं. अजित पवार पुन्हा नाराज असल्याची चर्चा रंगू लागली होती.
कारण पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात अजित पवारांची अनुपस्थिती दिसून आली. नाशिक, कल्याण आणि मुंबईच्या रोड शो मध्ये अजित पवार न दिसल्यामुळे त्यांच्याविषयी चर्चा सुरु झाल्या. दादा नेमके गेले कुठं ?यावर राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं की, अजित पवार नॉटरिचेबल असले की ते नाराज आहेत, अशा बातम्या माध्यमांमध्ये दाखवल्या जातात. पण ते नॉटरिचेबलही नाही आणि नाराजही नाहीत. अजित पवार यांना निवडणुकीच्या कार्यकाळात घशाचे इन्फेक्शन झाले होते, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काळजी घ्यायला सांगितली आहे. मात्र ते उद्यापासून पुन्हा प्रचारात सहभागी होतील”, अशी प्रतिक्रिया उमेश पाटील यांनी दिली.
दरम्यान यावर आता शरद पवार यांनी अजित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत भाष्य केलं आहे. बारामती मतदारसंघातील मतदान पार पडल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत कुठे, असा प्रश्न विचारला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात तसेच महायुतीच्या प्रचाराला त्यांची गैरहजेरी दिसत आहे. यावरून विविध वावड्या उठल्या असताना शरद पवारांनीही यावर भाष्य केलं. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली असता त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, बारामतीचे मतदान झाल्यापासून अजित पवार खरंच आजारी आहेत, अशी माझी माहिती आहे. त्यामुळे ते कुठे दिसत नसावेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काल महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कल्याण आणि नाशिकमध्ये जाहीर सभा घेतली. तसेच मुंबईत त्यांचा रोडशोदेखील आयोजित करण्यात आला. मात्र नाशिक किंवा कल्याणची सभा असो किंवा मुंबईतील रोडशो असो, उपमुख्यमंत्री अजित पवार हे कुठेही दिसून आले नाही. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. यावरच उमेश पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं. दरम्यान अजित पवार यांना जाणीवपूर्वक प्रचारापासून दूर ठेवले जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. या आरोपालाही उमेश पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. “काँग्रेसने केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहे. यात काहीही तथ्य नाही. अजित पवार यांचे कार्यकर्ते महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये, वॉर्डात, तालुका, जिल्ह्यात आहेत. मतदारांचा मोठा वर्ग त्यांच्या पाठिशी आहे. पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या नेत्याला प्रचारापासून बाजुला ठेवून कोण स्वतः चे नुकसान करुन घेईल का?” असे उमेश पाटील म्हणाले.