उत्तर महाराष्ट्रात आठ लोकसभा मतदारसंघ आहेत. हे सर्वच्या सर्व महायुतीच्या ताब्यात आहेत. यातील सहा जागांवर यंदा भाजप तर दोन जागांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत.सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला आपलं वर्चस्व राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागली आहे. कारण प्रचारात मोदी गॅरंटी, डबल इंजिन सरकार, केलेली विकासकामे या मुद्द्यांची ढाल पुढे करण्यात आली पण या तुलनेत शेतकऱ्यांचे प्रश्न, कांदा निर्यातबंदी, शेतमालाला मिळणारा कवडीमोल दर, पिण्याच्या पाण्याच्या समस्या, शेतकरी आत्महत्या हे मुद्दे अधिक तीव्र होते आणि त्यामुळे उत्तर महाराष्ट्र भाजपला जड जाण्याची शक्यता वर्तवली जाते. याच अनुषंगाने उत्तर महाराष्ट्रातल्या आठ लढती कशा झाल्या हे आपण या व्हिडिओतून पाहू…
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार,धुळे, जळगाव, रावेर, दिंडोरी, अहमदनगर, नाशिक आणि शिर्डी या सर्व आठ जागांवर २०१९ च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने विजय मिळवला होता.. यातील सहा जागा भाजपने एकहाती जिंकल्या होत्या.पण आता २०१९ सारखी परिस्थिती नाही..भाजपसोबत शिवसेना आहे पण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील… उद्धव ठाकरे सोबत नाहीत….त्यामुळे या निवडणुकीत हा विषय अगदी प्रखरपणे दिसून आला आहे… उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील त्यांना जनतेची सहानुभूती असल्याचं दिसून आलं…या तुलनेत भाजप आणि शिंदे सेना यांच्यावर जनता नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळालं… पक्ष फोडाफोडी जनतेला आवडलेली नाही…हा एक मुद्दा अगदी स्पष्टपणे दिसून आला…दुसरी बाब म्हणजे पक्ष फोडाफोडीमुळे या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महायुतीच्या माध्यमातून लढत आहे. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आहे.या भागात अजित पवार यांच्याकडे नेते आहेत, मात्र कार्यकर्ते नाहीत. अशीच कमी अधिक स्थिती शिंदे सेनेची देखील आहे.यांच्या तुलनेत भाजप मात्र अधिक संघटित आहे. त्यांनी निवडणुकीची पुरेशी आणि वेळेआधी तयारी देखील केली होती. मात्र निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी भाजपचा बराचसा वेळ खर्ची पडला. दुसरीकडे महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये फूट पडल्यामुळे त्यांची शक्ती कमी झालेली आहे. याची या तिघांनाही जाणीव आहे. त्यामुळे हे तिन्ही पक्ष अतिशय एकजुटीने भाजपचा मुकाबला करत आहेत. विशेष म्हणजे मतदारांमध्ये या तिन्ही पक्षांविषयी सहानुभूती होती. प्रत्यक्ष प्रचारात मैदानावर आणि सभा मेळाव्यातून वेळोवेळी ते दिसून आलं.
भाजपने उत्तर महाराष्ट्रातील आठ जागांवर जळगावातून उन्मेष पाटील वगळता उर्वरित पाचही खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली.जळगावमधून उन्मेष पाटील यांच्या ऐवजी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली. तसेच आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील या दोन विद्यमान मंत्र्यांच्या मुलांना उमेदवारी दिली. डॉ. सुभाष भामरे आणि डॉ. भारती पवार या केंद्रीय राज्यमंत्र्यांना उमेदवारी दिली गेली. या सर्व मतदार संघांची जबाबदारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे होती…त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या उमेदवारांसाठी पाच मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या सगळ्यांनी भाजपच्या उमेदवारांसाठी अतिशय नियोजनपूर्वक प्रचार केला.तर महाविकास आघाडीने दिलेले बहुतांश उमेदवार सर्वसामान्य घटकांतील आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी मतदारांना तक्रारी किंवा अपेक्षा दिसून येत नाहीत.नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे, शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे आणि जळगावमधून करण पवार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अहमदनगरमधून निलेश लंके, रावेरमधून श्रीराम पवार, दिंडोरीतून भास्कर भगरे हे तीन उमेदवार दिले.. धुळ्यातून डॉ शोभा बच्छाव आणि नंदुबारमधून गोवाल पाडवी हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. महाविकास आघाडीने या सर्व उमेदवारांसाठी जोरदार प्रचार केला आहे…उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, दिंडोरी, धुळे, नगर आणि जळगाव या मतदारसंघांमध्ये कांदा निर्यात बंदी आणि शेतकऱ्यांचा प्रश्न तीव्र होता. त्याने श्रीराम मंदिर, ३७० कलम आणि हिंदुत्ववाद या भाजपच्या प्रचाराला झाकोळलं. संपूर्ण निवडणुकीत प्रचाराचा हाच प्रमुख मुद्दा होता. त्याने सत्ताधारी पक्षाची अडचण केली.